'समाज सेवा ब्रीद आमुचे, स्वार्थ सुखाची आस नसे,
थोर कारणी देह वहावा, एक मात्र हा ध्यास असे'
अनेकांच्या जीवनात अनेक आठवणी व क्षण येतात. तसेच माझे जीवन घडत गेले. मी एक अतिशय गरीब घराण्यातला मुलगा आहे. गरीबीतून माझे प्राथमिक शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेमध्ये राहून पूर्ण केले व नंतर जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी 11वी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून मी मनात ठरवलं होतं की कोणाचातरी आदर्श घेऊन पुढे गेले पाहिजे व तेव्हापासून मी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वावरत होतो. अशाच परीस्थितीत मी 11वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण घेत असताना वरीष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) या युनिट मार्फत अनेक मुले विविध कार्यक्रमांचे आयोजन करित होते व त्या मार्फत ते वृक्षारोपण, पोलियो शिबिरं, रक्तदान शिबिरं अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत होती. त्यांना बघून मला सुद्धा मनात की मी त्यामध्ये सहभागी व्हावं व मी संबंधित कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल पाटील व प्रज्ञा कुलकर्णी यांना भेटलो व त्यांनी मला सहभागी करून घेतले.
मी जेव्हा एन. एस. एस. मध्ये प्रवेश घेतला तेव्हा मला असं वाटलं होतं की फक्त लोकांची सेवा करणे हाच उद्देश असे, परंतू यामध्ये लोकांची सेवा करता करता आपला स्वत:चा व्यक्तीमत्त्व विकासही घडवू शकतो हे शिकलो. मी प्रथम वर्षामध्ये मुलांबरोबर काम करित होतो व त्यामध्ये वनराई बंधारे, पोलिओ डोस पाजणे, सर्वेक्षण करणे यासारखी कामं करित होतो. हे करत असताना ती मनापासून करावी लागत होती आणि हे सर्व काम बघण्यासाठी कामावर नियंत्रण ठेवणारे कार्यक्रम अधिकारी यांनी मला निवडून काढले व त्यांनी विचारले की तू या शिबिराचे प्रतिनिधित्त्व करू शकशील का? मी होकार दर्शविला व तेव्हा पासून मी महाविद्यालयातील रासेयो प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली.
आज मी एन. एस. एस ची एकूण विद्यापीठ व राज्यस्तरीय पाच शिबिरे केलेली आहेत. या प्रत्येक शिबिरामध्ये मला वेगळे शिकण्याची संधी मिळाली आहे व अनेक शहरी विद्यार्थ्यांबरोबर संपर्क जोडला गेला व त्यांचे राहणीमन, बोलीभाषा, वेशभूषा बघून मी सुद्धा त्यांच्यासारखा माझ्या स्वत:त बदल करून घेतला. तसेच मी ग्रामीण खेड्यातला मुलगा असून सुद्धा त्यांनी मला सांभाळून घेतलं कारण एन. एस. एस ही यंत्रणा सर्व महाविद्यालयात एकत्र येवून काम करत असते. त्यामध्ये कुठलाही धर्म, जातीभेद केला जात नाही व राष्ट्रीय एकात्मता यातून सिद्ध होते.
आजपर्यंत आमच्या महाविद्यालयाचे तीन शिबिरांचे नियोजन करण्याची जबाबदारी मला सतत दोन वर्ष मिळाली आहे. यातून मला अनेक विद्यार्थ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली व सर्व स्वयंसेवकांनी मला सहकार्य केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये श्रमदानाबरोबर व्यक्तीमत्त्व विकास कसा करता येईल यासाठी अनेक मार्गादर्शक लाभले.
अनेक पथनाट्य, संगीत करमणुकीचे साधन म्हणून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली जाते व त्यातून ग्रामीण भागातील लोकांना व्यसनमुक्ती, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन या सारखे संदेश दिले जातात. राज्यस्तरीय शिबिरामध्ये आमच्या गटाने पथनाट्य स्पर्धेमध्ये हगणदारी मुक्त गाव या विषयावरती प्रथम क्रमांक मिळविला.
पूर्वी मी काम करत असताना आत्मविश्वास नव्हता परंतू आता मी नक्कीच काम करू शकतो. आमच्या महाविद्यालयामध्ये एखादा कार्यक्रम ठरला तरी तो मी यशस्वीपणे कसा पार पाडायचा याचे नियोजन करण्याचे संपूर्ण कौशल्य माझ्या अंगी आहे. त्याचा अर्धा वाटा हा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल पाटील व प्रज्ञा कुलकर्णी व माझे प्राचार्य व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक यांचा आहे.
रासेयो या नावात सर्व काही आहे. Not me, but you! म्हणजेच जे काही करू ते आधी समाजासाठी, देशासाठी, मग माझ्यासाठी हे माझ्या हृदयात कोरून ठेवले आहे आणि त्याचा मी नक्कीच माझ्या जीवनात राष्ट्रातील सर्व लोकांसाठी करेन, तसेच समाजातील महिलांच्या समस्या समाजात आज चाललेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्याचा मी पुरेपूर वापर करेन, व असा निर्धार प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करेन.
ज्यास गायचे जीवन गाणे। त्यास आभाळ मोकळे ॥
ज्यात नाही रक्त सळसळत। ते तारुण्य पोकळे ॥
वरील वाक्यातून असे सिद्ध होते की विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीचे सोने करायचे ठरवले तर करण्यासारखे खूप आहे. ही संधी आज मला रासयो ने उपलब्ध करून दिली आहे. मला जेवढं शक्य होतं तेवढा वेळ मी स्वयंसेवक म्हणून काम केलं. यातून मला पुढे वसतीगृहा मध्ये प्रतिनिधी म्हणून नियोजन करण्याची संधी मिळाली व त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांबरोबर काम केले. विद्यार्थ्यांमध्ये अनेक चांगले गूण असतात. परंतू त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नसते. म्हणून रासयो अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
आज रासयोचे अनेक अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनात घडले आहेत. ते सतत माझ्या स्मृतीत असतात व त्यातून समाजासाठी काम करत असताना ते काम तन मन धन अर्पण करून करित असतो. हाच माझ्या यशाचा खूप मोठा वाटा आहे. आज रासयो ने मला जे व्यसपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचा उपयोग पुढील आयुष्यात होईल
एक विचार समतेचा, उद्याच्या भवितव्याचा
अंधारातून प्रकाशाचा मार्ग, समाजाच्या उत्कर्षाचा।
-मनोज कामडी
जव्हार महाविद्यालय